Wednesday, June 23, 2010
कोसला
शंभरातील नव्व्याण्णंवास.. मराठीत क्वचितच एखाद्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाच एव्हडी भन्नाट सुरु होते. पुढचे पान अजूनच जबरदस्त. वर लिहिलेली ओळ ह्याच पहिल्या पानावरची. कोसला. म्हणजे कोष.
कुठल्यातरी सांगवी नामक गावातला पांडुरंग सांगवीकर स्वत:ची कथा सांगायला सुर करतो. कथा घडते मुख्यत्वेकरुन ५९ ते ६३च्या पुण्यामध्ये. पण त्याआधी मॅट्रिकचा अभ्यास करताना उंदीर मारणारा पांडुरंग, घरातल्या आई-आजीचे पिचलेपण, त्यातून होणारी भांडणं, मुळची त्रास देण्याची वृत्ती, वडिलांची क्षुल्लक गोष्टीतली लांडी-लबाडी खोटारडेपणा आणि ह्यात तयार होत गेलेला संवेदनशील, भावनाप्रधान व वरुन घट्टपणा दाखवत मिरवणारा पांडुरंग आपल्यासमोर मोजक्या शब्दात उभा राहतो. तिथून पुण्यात आल्यावर पहिल्या वर्षात गावाकडचे बुजरेपण टाळत ’व्यक्तिमत्व’ घडवण्याच्या मागे जाणारा सांगवीकर, गॅदरिंगला कल्चरल सेक्रेटरी होउन पदरचे पैसे खर्च केलेला सेक्रेटरी, अभ्यासाकडे दुर्लक्ष करत ’चमकण्याच्या’ मागे असलेला सांगवीकर, घरुन येणार्या पैश्यांची फारशी फिकीर नसलेला आणि आल्या-गेलेल्याला चहा-सिगरेटी पाजणारा सांगवीकर, मेस सेक्रेटरी असताना वर्षाच्या शेवटी जोरदार फटका बसलेला सांगवीकर इंटरच्या आणि ज्युनिअरच्या वर्षात वाहत जातो. मनू मेल्याचे दु:ख पचवण्याची क्षमता नसलेला, मानसिक षंढत्वाची जाणीव होणारा, पैश्याची काटकसर करताना आताच्या त्याच्यासारख्या पैसे खिशात न खुळखुळवणार्या मित्रांबरोबर राहूनही एकूणातच सर्वांपासून अलिप्त होत, दूर होत जाण्याचा प्रवास करणारा सांगवीकर आता दिसतो. आणि मग शेवटी एकूणच परिक्षेत पेपर सोडून शिक्षणाला रामराम ठोकून, गावी परत जातो. तिथे वडिलांच्या धंदा-कारभाराला शिव्या देत, थोडेफार त्यातलेच काम बघत, इतर अश्याच शहरात राहून शिकून गावी परतलेल्या कंपूत दिवसचे दिवस ढकलणारा, आता जे होइल ते होवो, सगळेच भंकस, मग का चिंता करा अश्या पराभूत तत्वज्ञानाशी येउन पोचलेला पांडुरंग. इतकीच खरेतर कोसलाची कथा.
पण ह्या सगळ्या स्थित्यंतरात कोसला ह्या कलाकृतीने किती एक गोष्टी वाचकाच्या समोर आणल्या आहेत. कोसलाची भाषाशैली. सुरुवातीला उदाहरणार्थ, वगैरेचा अतिरेक करुन तेव्हाच्या रुळलेल्या कादंबरीय भाषेला छेद देत कोसला सुरु होते. कोसलात कुठेही, 'आई म्हणाली, "..." - मग अवतरणचिन्हात संवाद वगैरे भानगड नाही. संपूर्ण गद्य सलग शैलीत लोकांमधील संवाद, पांडुरंगाची मानसिकता (पुस्तक प्रथमपुरुषी निवेदनशैलीत आहे) एकामागोमाग येत राहतात. पण वाचकाला कुठेही तुटकता येत नाही, गोंधळ उडत नाही. असे लिहिणे खरेच फार अवघड आहे. कोसलात कुठेही शिवीगाळ नाही, लैंगिक-कामुक वर्णने नाहीत, मध्यमवर्गीय कुटुंबातून ज्या श्लीलाश्लीलतेच्या मर्यादा बोलताना पाळल्या जातात त्या मर्यादेत संपूर्ण पुस्तकभर भाषा आहे. पण कुठेही ती भाषा मिळमिळीत होत नाही. तसेच रुक्ष मन:स्थिती, वास्तवता दाखवण्यासाठी भडक शब्दांची साथ घेत नाही. तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब कोसलात पडत राहते, आजूबाजूला दिसत राहते. वेगवेगळ्या कुटुंबामधून, आर्थिक स्तरांतून आलेली मुले-मुली, त्यांची राहण्याची-वागण्याची पद्धती, पांडुरंगचा श्रीमंत-गरीब असणाची वर्षे, त्याचे बदलणारे मित्र आणि सिगारेटी कथानक पुढे नेत राहतात. डायरीच्या रुपातून एक आख्खे वर्ष समोर येते. भविष्यातल्या इतिहासकाराच्या नजरेतून आजच्या समजाची टर उडवली जाते. महारवाड्यातल्या वह्यातून जगण्याचं एक तत्त्वज्ञान बाहेर येतं.
पण ह्या सगळ्यातून एक समान धागा, सूत्र वा विचार येत राहतो तो पांडुरंगला पडलेल्या प्रश्नांचा - जगण्याचे प्रयोजन, असण्याचे प्रयोजन, असलोच तर मी असाच का वा दुसरा एखादा तसाच का - शोध, त्यांची न मिळणारे उत्तरे, उत्तरं न शोधता त्यापासून दूर दूर पळणारा पांडुरंग आणि मृत्युमुळे हे सुटेल काय ह्याची खोल मनात तळ करुन असलेली त्याची आशा हे कादंबरीत जागोजागी येत राहतात. ’भटकते भूत कोठे हिंडते?’ अश्या एका तिबेटी प्रार्थनेपासून ह्या प्रश्नाच्या मृगजळामागे पांडुरंगाचा प्रवास सुरु होतो. मनीच्या मृत्युंनंतर तो हे प्रश्न थेट विचारतो. पण तेव्हडेच. बाकी सगळीकडे अप्रत्यक्षपणे, माहिती असून तो प्रश्नांना सामोरा जात नाही. उत्तरं वांझोटीच असणार आहेत असा एक विश्वास त्याला आहे. आणि म्हणुनच त्याच्या हाइटन्ड मोमेन्ट्सनंतर तो भरार पाणी ओतून रिकामा होतो. उदाहरणार्थ, सांगवीकरच्या तिसर्या वर्षाच्या खोलीचे एक गहिरे चित्रण करुन, एका स्वप्नातून उभी केलेली हॉस्टेलच्या आयुष्यातली क्षणभंगुरता पण तरिही एकमेकांबरोबर व्यतीत केलेला प्रचंड वेळ ह्या सगळ्याचा अंत एका वहिवाल्याच्या वहीनं होतो:
क्रम संपता दोन्ही भाई भांडती हो भांडती
आत्मा कुव्हीचा नाही कोनी सांगाती हो SSS सांगाती
अन् आत्मा कुव्हीचा नाही कोणी सांगाती SS
पण ह्या इंटेन्स/तीव्र वातावरणात सुर्श्याचा एक जोक लगेच पुढे येतो: ’एकजण अचानक माझ्या खोलीवर टकटक करून बळजबरीनं आत आला. तो म्हणाला, एक्स्क्यूज मी. ही माझी पुर्वीची खोली. आहा. हीच खोली. काय ते दिवस. हीच ती खिडकी. हेच बाहेरचे झाड. असंच माझं टेबल खिडकीशी असायचं. आहा. हीच कॉट. अशीच माझीही होती. हेच माझं कपाट. ह्या कपाटात मी कपडे ठेवायचो. आहा, आणि ह्यात अशीच लपून बसलेली नागडी मुलगी.’ बदबदा पाणी ओतून पांडुरंग रिकामा.
पांडुरंगाची सगळ्याला क्षुल्लक ठरवण्याची वृत्तीच्या मागे मी का जगतोय वा काय अर्थ आहे का ह्याला हा धागा जास्त दिसतो. त्यातून तो सुरुवातीला गावाला, गावातल्यांना, त्यांच्या मानसिकतेला शिव्या देत शहरात रमून जायचा प्रयत्न करतो तर कादंबरीच्या शेवटाला शहराला शिव्या देत गावच बरा म्हणत येतो. नॉस्टॅल्जिया त्याला तो येवून देत नाही, पण खोल तळाशी कुठेतरी त्याला एक एक सोडून जाणारा मित्र, खोली, वर्षे अस्वस्थ करत जाते. शेवटाला तो सगळंच सोडून फक्त प्रवाहात तरंगणारी काडी व्हायला तयार होतो.
’कोसला’ने एक पुस्तक म्हणुन मला स्वत:ला प्रचंड आनंद दिला आहे. पांडुरंग पलायनवादी आहे का? हो, आहे. निराशावादी आहे का? हो, आहे. तो रुढार्थाने आदर्श व्यक्तिमत्व आहे का? नाही. पण म्हणुन मला कोसला कमअस्सल वाटत नाही. अशी माणसेदेखील असतात, आहेत. कोसलातला पांडुरंग पराभूत होतो, निराश होतो, सत्यापासून पळून जातो म्हणुन कोसला दुय्यम वा अवाचनीय ठरत नाही. उलट एक अतिशय समृद्ध, सकस साहित्यकृतीचा अनुभव वाचकास नक्कीच देते. कोसलातील कित्येक प्रसंगांचे वर्णन अफाट आहे. कुठेही जडबंबाळ, बोजड, अलंकारीक भाषा नाही. वाक्य पण सगळी छोटी-छोटी तुकड्यात. पांडुरंगाला सुर्श्या पहिल्यांदा भेटणे आणि त्यांची दोस्ती होणे हे केवळ ’पण सुरेश सारखा माझ्या डोक्याकडे पहात होआ. शेवटी तो म्हणाला, तुमची बाटली फुटली वाटतं? हे थोरच आहे. मग आमची दोस्ती झाली.’ इतक्याच मोजक्या संवादातून उभे करतो. कोसलामधला विनोद पण सहसा न आढळणार्या पद्धतीचा आहे. तो होतो, घडवून आणला जात नाही आणि विनोद केल्यावर लेखक 'बघा मी कसा विनोद जुळवुन आणला' असे न करता मॅटर ऑफ फॅक्टली पुढे जातो. उदा. तांबेचे कविता करणे, त्याच्या जीवनात उद्दिष्ट्य असणे आणि महान नाटके लिहिणे: तांबेच्या नाटकातला एक प्रवेश -
प्रभाकर: (मागे सरुन) सुधा याचं उत्तर दे.
सुधा: अरे पण प्रभा, माझे वडिल माझ्याबरोबर होते, आणि तू हाक मारलीस.
प्रभाकर: (पुढे येत) असं होय? मला वाटलं तू मला माकड म्हणालीस ते मनापासूनच.
हे असले भयंकर लिहीत कोसला तुम्हाला बुडवून टाकते. मावशीच्या नवर्याने ’इतिहासच घे बीएला, इतिहासाच्या प्राध्यापकाला दरवर्षी नवीन वाचायला लागत नाही’ असे सांगणे, इचलकरंजीकर, रामप्पा, ते दोघे, सिगरेटी, मद्रास, चतुश्रुंगी-वेताळ टेकड्या, अजंठ्याची सहल सगळेच महान - ओघवते - प्रवाही. अजंठा तर केवळ महान. मनू मेल्यावरची पांडुरंगची तगमग, घरातल्या सर्वांवरचा राग, आपण काही करु न शकण्याचे, क्षुद्र असण्याची जाणीव, पलायनाचे मार्ग शोधणे हे सगळे पुन्हा-पुन्हा येते. तो एके संध्याकाळी पावसात भिजून हॉस्टेलवर परतल्यावर पांडुरंगला झालेला साक्षात्कार की गेली चार वर्षे राहिलेली ही जागा, इतक्या मित्रांसोबत काढलेला वेळ, कुणाचेच कुणी नाही. सगळेच इथे तात्पुरते. आपले काहीच नाही. आणि मग कादंबरीत क्वचितच येणारा थेट प्रश्न - ’मग सगळ्या आयुष्यात हेच - आपल्या कशालाच किंमत नाही’. आणि मग शेवटच्या पेपरात पाय लांब करुन दोनच प्रश्नांची उत्तरं लिहून बाहेर पडलेला सांगवीकर. मी प्रत्येकवेळी हा भाग वाचताना शहारतो - घाबरतो. केवळ उरतो.
भटकते भूत कोठे हिंडते?
पूर्वेकडे? की उत्तरेकडे.
पश्चिमेकडे? की दक्षिणेकडे.
देवांचे अन्न पृथ्वीच्या कोपर्याकोपर्यांत विखुरले आहे आणि तुला
ते खाता येत नाही, कारण तू मेलेला आहेस
ये, हे भटकत्या भुता, ये. म्हणजे तुझी सुटका होईल आणि तू
मार्गस्थ होशील.
तिबेटी प्रार्थना.
(कोसलातील दुसर्या पानावरुन).
Saturday, April 17, 2010
दंडोबा
ह्या दंडोबाच्या टेकडीवर गावी असताना कितीदा आलो ह्याची गणतीच नाही. गाडीवाटेनं आलं तर डांबरी सडकेपासून तासाभरात वर पोचायचो. मुरुमाच्या दगडातली काळीकुट्ट गुहा. आत कुणीतरी लावलेल्या पणतीचा मिणमिणता उजेड आणि त्या उजेडात फडफडणारी शंकराची पिंड. गुहेत आत शिरलं, की वटवाघळांच्या शिटेचा उग्र दर्प. आणि मग पिंडीला एक प्रदक्षिणा. गुहेची मागची भिंत आणि शंकराची पिंडी असलेलं गर्भगृह, यांच्यामध्ये एक फुटाची सांदरी होती. जणु भुयारच. काड्यापेटीची काडी पेटवुन हळुच ह्या सांदरीमध्ये शिरायचं. सतत पाणी झिरपून मऊसूत झालेला तो दगड, त्याला एक कुबट वास यायचा.
ह्या गुहेच्या छपरावर एक चांगलं मोठं पठार होतं. एक एकर्-दोन एकर तरी असेल. आणि त्या पठारावर कधीकाळी कुणीतरी बांधलेला हा मनोरा. असेल तीस्-चाळीस फूट उंचीचा. वर निमुळता होत गेलेला. वर चढायला अर्ध्या उंचीपर्यंत बाहेरुन पायर्याळ. आणि मग टोकापर्यंत आतुन गोल्-गोल पायर्या . अर्धा चढुन आल्यावर एक देवडी, पाच बाय पाच फुटाची. आणि मग अगदी वरपर्यंत चढुन आलं की हा मी आज बसलो होतो तो दोन फूट त्रिज्येचा कट्टा. मध्यभागी झेंडा उभारायला एक खळगा. माझी ह्या मनोर्याआशीच जास्ती गट्टी होती.
दंडोबावर रात्री मुक्कामाला यायला सुरुवात केली, ती मी आणि सत्यानं. घरातुन ओवाळून टाकलेले आम्ही दोन वळू. गाव बोंबलत असताना आम्ही इथं येउन रात्री मुक्काम केला होता. रात्री तशी धाकधुक, भिती वाटतच होती. पण रात्र काढली. त्यानंतर मात्र सपाटाच लावला. गाडीवाटेनं, सिद्धेश्वराच्या दगडांच्या खाणींच्या बाजुनं, मागच्या जैन मंदीराच्या बाजुनं, हायवेला ट्रक पकडून आणि मग मधेच कुठेही उतरून सरळ मनोर्याुच्या दिशेनं चढत, अश्या अनेक वाटांनी ही दंडोबाची टेकडी चढलो. संध्याकाळी गावाबाहेर येऊन हायवेला ट्रक पकडायचा. पाच-सात रुपयात १०-१२ मैलावर कुठेतरी उतरायचं. आणि मग चढायला सुरुवात करायची. हायवेला समांतर पसरलेली ही दंडोबाची बोडकी रांग माझ्या त्या चार वर्षांची जोडीदार होती.
पण दंडोबाचा पहिला कीडा डोक्यात सोडला तो भाउंनी. भाउ म्हणजे माझे आजोबा. शाळेत असताना मी आजी-भाउंबरोबर गावातल्या वाड्यातल्या घरात राहायचो. आई, बाबा आणि ताई बंगल्यावर राहायचे. पण बंगला गावाबाहेर असल्याने मला शाळेला यायला-जायला खूप लांब पडायचं. आणि म्हणुन मी गावात आजी-भाउंबरोबर.
रोज सकाळी पावणेपाच्-पाच वाजता भाउ मला उठवायचे आणि दात घासुन तालमीत पिटाळायचे. तिथं मल्लखांब करुन मी घरी परतेपर्यंत ते फिरुन परत आलेले असायचे. हमखास ओट्याशी उभं राहुन दुध गरम करत, जोर्-जोरात हरीपाठ म्हणत असायचे. हरीमुखे म्हणा हरीमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी! मला खरे तर गरम दुधाची चव अजिबात आवडायचे नाही. पण तरीही दुध पिउन, आवरुन मी सकाळच्या शाळेला पळायचो. एकदा मी तसाच दुध न पीता शाळेला गेलो तर, मधल्या सुट्टीत भाउ एका पिवळ्या झाकणाच्या काचेच्या बरणीत दुध भरुन घेउन आले. मला अस्सा राग आलेला. पण ते सगळं दूध त्यांनी मला प्यायला लावलं.
संध्याकाळी आजी-भाउ रमी खेळायचे. काय वाट्टेल तशी रमी चालायची. आजीचा एक्-एक सिक्वेन्स सहा-सात पानांचा असायचा. पण भाउ आपले काही न बोलता, मिश्किल हसत, रमी खेळत बसायचे. मग थोड्यावेळाने दूरदर्शनवर मराठी सिरिअल्स सुरू व्हायच्या. आमच्याकडं असलेला ब्लॅकनव्हाइट टीव्ही हा आत्यानं नवीन कलर टीव्ही घेतला म्हणुन देवून टाकलेला. त्यात मुंग्याच जास्ती दिसायच्या. इतक्या जास्त की कधी क्रिकेटची मॅच असली की बॉल पण दिसायचा नाही त्या मुंग्यांमध्ये. मग अधुन मधुन भाउ मला शेजारच्या जोश्यांकडे स्कोअर बघायला पिटाळायचे. ह्या त्यांच्या टीव्ही, रमी कार्यक्रमांमध्ये मी कायम त्यांच्या मांडीवर लोळत असायचो. कधीमधी जर आत्या आलेली असेल, तर सारखं मला हाड्-हाड करायची. म्हणायची, 'बघ कसा मांजरासारखा चिकटलेला असतो भाउंना नेहेमी'.
पण मला त्यांच्या मांडीवर लोळायला आवडायचे. त्यांच्या चेहर्याहवर एकदम मऊमऊ सुरकुत्या होत्या. आणि ते मला कधी कधी थापटायचे तेव्हा त्यांच्या हातालासुद्धा एक प्रेमळ वास यायचा. खरतरं, त्या वाड्यातल्या प्रत्येक वस्तुलाच एक वेगळा स्वतंत्र वास होता. वरच्या खोलीतल्या शहाबादी फरश्यांचा वास, जिन्याच्या लाकडी कुसं हातात घुसणार्यास दांडक्याचा वास, मोरीतल्या पितळी तांब्याचा वास, ओट्यावर असलेल्या खिडकीच्या लोखंडी जाळीला येणारा फोडणी आणि घट्ट धुळीचा एकत्र वास. अगदी बाहेरच्या लोखंडी कडीलासुद्धा एक जुना, बळकट वास होता.
सुट्टीच्या दिवशी भाउ मला सकाळी सोबत घेउन फिरायला जायचे. पंढरपूर रोडला पोचलो की दूरवर दिसणारी डोंगररांग दाखवून म्हणायचे, 'तो बघ दंडोबाचा डोंगर. एकदा घेऊन जाईन मी तुला दंडोबावर.' मग मी भाउंना दंडोबाबद्दल खूप काय काय विचारायचो. काय आहे तिथे वरती, कोण राहतं, वाघ आहे का, कसं जायचं तिथपर्यंत. आणि भाउंकडे सगळ्या प्रश्णांची उत्तरं असायची.
हळुहळु करत दंडोबाच्या डोंगरावर कसं जायचं ह्याची योजना माझ्या डोक्यात पक्की झाली. पायथ्याच्या गावापर्यंत सायकलने जायचे आणि गावात सायकल लावुन, डोंगराच्या टोकाकडे चढायला सुरुवात करायची. बरोबर खाण्याचा डबा, डब्यात पोळी आणि बटाट्याची सुकी भाजी, वॉटरबॅग, भाउंचा मोठा टॉर्च, टोपी, मोठ्ठा रुमाल, दोरी आणि सायकलचा पंप. आता पंप सोडून बाकी सगळ्या गोष्टी होत्या. पण कोपर्याीवरच्या इर्षाद सायकलवाल्याकडे दोन पंप होते. त्यामुळे त्याने एक नक्की दिला असता.
चौथीची परीक्षा संपली होती. एके दिवशी सकाळी क्रिकेटची मॅच खेळून झाल्यावर, महश्या कुलकर्णी, बारका पश्या, काळा पश्या आणि सुन्या खैरमोडेला, माझा प्लॅन सांगितला. महश्या आणि बारका-काळा पश्या, ह्यांच्याकडं वडलांच्या सायकली होत्या. माझ्याकडे एक माझी स्वःताची बारकी सायकल होती. सुन्याला त्याच्या बाबानी सायकल तर दिली नसतीच, वर तंगडं मोडलं असतं. पण सुन्यानं घरातल्या दुकानच्या गल्ल्यातून अधुन मधुन थोडे थोडे पैसे हाणुन थोडेफार जमवले होते. त्या पैशातून दिवसभरासाठी भाड्याची सायकल घेता आली असती. आता काय्-काय घ्यायचं आहे ते परत एकदा चौघांना सांगून दुसर्याी दिवशी सकाळी आमच्या वाड्यासमोर सहा वाजता जमायचे ठरले.
मी दुपारी जेवताना भाउंना सगळा प्लॅन सांगितला. अगदी इर्षादकडून पंप घेणार आहे हे पण सांगितले. पण ऐकून, भाउ एकदम विचारात पडले. मला वाटलं हे ऐनवेळी नाही म्हणणार. तेव्हड्यात ते म्हणाले, 'पण तुला रस्ता कसा सापडणार?' मी म्हटलं, 'हात्तीच्या! त्यात काय!! सरळ वाड्यातनं बाहेर पडायचं, मालगांव वेशीतून पटवर्धनांच्या वाड्याच्या बाजुने पुढे जायचं. मग तासगांव वेशीचा मारुती आला की पंढरपूर रोड वरुन सरळ दंडोबाचा पायथा येइपर्यंत सायकल चालवायची. एकदा का पायथा आला की मग चढायला सुरुवात.'
'ते बरोबर आहे रे.', भाउ म्हणाले. 'पण डोंगरावर दाट जाळ्या आहेत. भरपूर पायवाटा आहेत. त्यातली एकच पायवाट वरपर्यंत जाते. जर का ती चुकली, तर मग माणुस गोल गोल फिरत राहतो तिथल्या तिथेच. आता वर जायची वाट माहिती असल्याशिवाय कसा जाणार तू?'
आता मात्र मी रडवेला झालो. इतके दिवस दंडोबाबद्दल सगळं ऐकत होतो. पण आज जायच्या आदल्या दिवशीच ह्या पायवाटा आणि चोरवाटा कुठुन उपटल्या. पण मग भाउच म्हणाले, 'वरच्या गल्लीतल्या हरबाकडे, दंडोबाकडच्या एका गावातला दूधवाला येतो. तो आहे का ते बघुन येतो. आला असेल तर सांगतो त्याला, की उद्या ह्या पोरांना घेवून जा दंडोबावर. काय?' आणि चपला पायात सारुन भाउ घराबाहेर पडले.
आता हरबाच्या घरात एक म्हैस होती खरी. पण त्याच्याकडं कुणी दुधवाला येतो हे काय मी कधी ऐकले नव्हते. पण भाउ एव्हड्या दुपारचे गेले होते म्हणजे येत असेल बाबा कुणीतरी. थोड्यावेळाने भाउ परतले. उन्हातुन आल्यामुळे त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता.
'चार दिवस झाले, तो हरबाचा दुधवाला काही आला नाहीये रे. बहुतेक आजारी पडला असावा. एकदा का तो आला की मी लावुन देतो तुम्हाला त्याच्या बरोबर.'
मी भाउंवर चिडलोच एकदम. एकतर एव्हडा सगळा प्लॅन केलेला. परत उद्या महश्या, दोन्ही पश्या आणि सुन्या येणार सकाळी, सगळ्या तयारीत. आणि माझा पचका. मी भयानक चिडून तालमीच्या ग्राउंडवर गेलो. दुपारच्या रटरटत्या उन्हात, ग्राउंडवर गाढवं सोडून, काळं कुत्रं नव्हतं. मी कवठाच्या झाडाखाली जाउन बसलो. खुप चिडल्यामुळे कानाच्या पाळ्या गरम झाल्या होत्या. वाटत होतं की आता धूर निघेल कानातून. मग मी खूप वेळ गुढघ्यात डोकं खुपसून रडत बसलो.
दुसर्यार दिवशी सकाळी महश्या, पश्या, सुन्या, कुणीच आले नाहीत.
सुट्टी संपली. शाळा सुरु झाली. ऑगस्टमध्ये भाउ आणि त्यांच्या सकाळच्या फिरण्याच्या ग्रुप मधले, चिवटे अण्णा, बर्वे मास्तर, तात्या काका आणि मी, असे पाच जण आषाढी एकादशीच्या काही दिवस आधी पंढरपूरला गेलो. भाउंनी मला वारी, ज्ञानदेव्-तुकारामांच्या पालख्या, रिंगण, बाजीरावाची विहीर, विठोबाचं देउळ, असं सगळं दाखवलं. पण मुख्य म्हणजे, येताना आणि जाताना बसमधून दंडोबाचा मनोरा दाखवला. आणि म्हणाले, 'मी तुला एकदा दंडोबावर घेउन येइन नक्की.'
सहामाही परीक्षा झाली. दिवाळीची सुट्टी संपून परत शाळापण सुरू झाली. सकाळी थंडी असायची. प्रार्थना सुरु व्हायच्या आधी आम्ही काही मुलं थोडा वेळ कबड्डी खेळायचो. त्या दिवशी, सकाळी कबड्डी खेळताना, शिवणीवर चड्डी फाटली. एका हातानं तशीच चड्डी पकडून प्रार्थना आणि जनगणमन संपवलं. वर्गात पोचलो तर वर्गशिक्षक म्हणाले, 'दप्तर आवरुन बाहेर पळ. तुझी आई आली आहे तुला घरी घेउन जायला.'
मला कळेना की आईला कसे कळले की माझी चड्डी फाटली आहे ते. बाहेर गेटपाशी, आई रिक्षामध्ये बसली होती.
वाड्याच्या दारात रिक्षा आल्यावर, एका हाताने चड्डी पकडून मी आत धाव ठोकली. आज सुट्टी, त्यामुळे दिवसभर नुसतं खेळायचं. आत आलो आणि.
खालच्या खोलीत जमिनीवर भाउ झोपलेले होते. त्यांच्या नाकात कापुस घातला होता. आणि गळ्यात हार. शेजारी आजी रडत होती.
शेवटची सिगरेट संपली. घश्याला कोरड पडली होती. सुर्य मावळुन अर्धा-एक तास उलटुन गेला होता. काळाकुट्ट अंधार पसरला होता. आजवर कितीतरी वेळा दंडोबावर आलो, कित्येक डोंगर दर्याे पालथ्या घातल्या, जगभर हिंडलो.
पण भाउंचा दंडोबा चढायचा राहिलाच.
Tuesday, March 23, 2010
बाकी शून्यः कमलेश वालावलकर
मराठीत मी वाचलेल्या काही सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक पुस्तक. पहिल्याच पानापासून जबरदस्त पकड घेत हे पुस्तक एका विशिष्ट वेगाने जयदीप सरदेसाई नावाच्या इंजिनिअर-पत्रकार-सेल्समन-दारुडा-वेश्याबाज माणसाची कहाणी मांडते. कदाचित ह्या पुस्तकातले ज्युनिअर कॉलेज, आजूबाजूचा परिसर, इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिकची अंबड एमआयडीसी आणि तिथली एक बंगाली लोकांची वरचश्मा असलेली कंपनी अश्या अनेक गोष्टी समान असल्याने हे पुस्तक मला थेटच भावले. त्यामुळे कदाचित बाकी काही गोष्टींकडे कानाडोळा झाला असेल. पण त्यामुळे हे पुस्तक भिडले पण खूप जोरात.
अनेक लोकं करतात म्हणुन सुरु केलेले ग्रॅज्युएशनचे शिक्षण, जन्मतःच असलेली टोकाची संवेदनशीलता पण त्याच तोडीच्या सर्जनशीलतेचा अभाव आणि त्यामुळे होणारे विचित्र कॉकटेल - ज्यात व्यक्ति ना धड चांगली कलाकार (निर्मिती करणारा/री) होउ शकते ना धड सामान्य (नॉर्मल) माणूस.. आणि मग एक विचित्र घुसमट.. त्यात जोडीला उभे राहणारे अस्तित्वाबद्दलचे प्रश्न.. कादंबरीच्या नायकाला अधून मधून पडणारे प्रश्न, त्याचे संस्कृती-समाज-व्यक्ति ह्याबाबतची वक्तव्य हे सगळे ह्या मानसिकतेच्या-जडणीच्या(मोल्ड) व्यक्तिचे अतिशय सही सही वर्णन करते. अप्रतिम.
मी आहे म्हणुन जग आहे, माझ्या दृष्टीकोनातून जगाचे अस्तित्व माझ्या जन्माबरोबर सुरु होते आणि मृत्युबरोबर संपते, ज्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण जास्त तो समाज अधिक प्रगत, जातीव्यवथा, आरक्षणाचे समर्थन, जीवनाच्या निरर्थकपणामुळे येणारी टोकाची निराशा ह्या सगळ्याच गोष्टी फार प्रभावीपणे मांडलेल्या आहेत.
अनेकांना हे पुस्तक शिवराळ वाटू शकेल, भडक वाटू शकेल. पण मला स्वतःला तसे एकदाही वाटले नाही. माझ्या कॉलेजात जवळपास इतपत शिव्या अश्या प्रकारच्या सगळ्या मुलांच्या तोंडी असत. स्त्रीदेहाबद्दलचे आकर्षण, मुला-मुलींच्यात असलेले अनैसर्गिक अंतर, लैंगिक अतृप्ती आणि त्यातून येणारी विकृती (मग कधी ती मुलींना वर-खाली अधाशी नजरेने बघण्यातून व्यक्त होते तर दुसर्या टोकाला शारिरीक अत्याचारातून) हे देखील तसेच्या तसे आलेले आहे.
लेखक कुठेही कश्याचेही समर्थन करत नाही. नायकाच्या मनःस्थितीचे उदात्तीकरण तर मुळीच करत नाही. पण म्हणुन त्या मनःस्थितीचे, ती मनःस्थिती उद्भवण्यास कारणीभूत घटकांना (समाज, जन्मानेच आलेले गुण इत्यादी) बाइज्जत-बरी पण करत नाही.
बाकी शून्य वाचताना कोसलाची आठवण येणे आणि म्हणुनच तुलना होणे अपरिहार्य. कोसला भाषिक सौंदर्याच्या निकषावर नक्कीच उजवी आहे. भाषेला गोडवा आहे. बाकी शून्य अधिक रखरखीत आहे, लेखक म्हणुन देखील नेमाडे वालावलकरांपेक्षा उजवे आहेत. पण कोसला ही फार थोड्या कालाचे वर्णन करते व मुख्यतः विद्यार्थीदशेतच मर्यादित राहते तर बाकी शून्यचा विस्तार बराच मोठा आहे. दोन्ही कादंबर्यातले ठसठशीत साम्य म्हणजे दोन्ही कादंबर्या निश्कर्षाप्रती पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटच्या अध्यायात फसतात. निरर्थकतेच्या जाणीवेतून आणि समाजापासून विलग झाल्याच्या भुमिकेतून आलेली निराशा आणि तिचे टोकाचे रुप हे तिथेच सोडून न देता त्याला एक अंतिमता देण्याचा प्रयत्न दोन्ही कादंबर्यात फसलेला वाटतो कारण कदाचित ह्याला अंतिमताच नाहिये. बाकी शून्यची अजून एक कमी म्हणजे शेवटी शेवटी ही कादंबरी खर्याखुर्या प्रतलास (रिआलिस्ट) सोडून जुळवून आणलेल्या घटनांच्या मागे जाते (त्याचे उगाचच लोकांना वाटणारा साधू-चमत्कारी होणे, मिशेल बरोबर राहताना हमाली करणे आणि शेवटी देवयानीबरोबर लग्न).
ऑल इन ऑल, ही एक जबरदस्त कलाकृती आहे.
(ह्याबद्दल झालेली आधिची चर्चा इथे वाचता येईल: http://www.maayboli.com/node/13668 )
Wednesday, March 17, 2010
विहिर
उद्याच्या शुक्रवारी (१९ मार्च) विहिर हा उमेश कुलकर्णीचा (वळु चित्रपटाचा दिग्दर्शक) सती भावे-गिरिश कुलकर्णींच्या कथा/पटकथेवरचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मी जानेवारीमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बघितला होता. त्याच दिवशी हे टिपण लिहिले होते पण इतके दिवस इथे डकवायचे राहून गेले. आता चित्रपट प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने आज इथे पोस्ट करत आहे.
------------------------------------------------------------------------------
कठोपनिषद:
बहूनामेमि प्रथमो बहूनामेमि मध्यम:
किंस्विद् यमस्य कर्तव्यं यन्मयाऽऽद्य करिष्यति
-- कधी मी सर्वोत्कृष्ट, तरी कधी सामान्य असतो. माझ्या असण्यातून काय साध्य होत आहे?
येयं प्रेते विचिकित्सा मनुष्ये
अस्तीत्येके नायमस्तिती चैके
एतद् विद्यामनुशिष्टस्त्वयाऽऽहं
वराणामेष वरस्तृतीय:
-- माणूस मेल्यावर काही लोक म्हणतात की तो मेला नाहिये तर अस्तित्वातच आहे आणि काही म्हणतात की सगळे संपले. हे यमा, तिसरा वर म्हणुन तू मला हा माणसाला पडलेला जो गहन प्रश्न आहे त्याचे उत्तर दे.
---------------------------------------------------------------------------------
आपण असतो म्हणजे काय? आणि का असतो? असेच का असतो? का जगतो? माणुस मेल्यावर काय होते? तो असतो की नसतो? असला तर कुठे असतो? नसेल तर मग असण्याला अर्थ काय? कठोपनिषदात नचिकेताने यमाला हे प्रश्न विचारुन भंडावून सोडले. प्रत्येकालाच कधी ना कधी पडणारा हा एक खराखुरा वैश्विक प्रश्न आहे जो भाषा, संस्कृती, शि़क्षण ह्यांच्या पलिकडे जाउन प्रत्येकाच्या मनात वावरत असतो. कुणामध्ये ह्या प्रश्नाची तीव्रता जास्त तर कुणात ती अगदीच किरकोळ, कुणास हा प्रश्न अगदी लहान वयातच लख्खपणे दिसतो तर कुणी हा प्रश्न मरेपर्यंत विचारात बांधूच शकत नाहीत (मग शब्दात तर दूरच), कुणी आत्म्याला चिरंतन मानून देवाचे अस्तित्व नाकारतात तर कुणी चिरंतन आत्म्याला अद्वैताच्या आधाराने विश्वाशी एकरुप करतात.
जन्मण्यामागचे कारण, जगत राहण्याचा उद्देश आणि मरणाचे गूढ ह्यावर आदीम मानवापासून आजचे आघाडीचे उत्क्रांतीशास्त्रज्ञ विचार करत आहेत, करत राहतील. अनेक महान साहित्यकृतींनी ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा वा प्रश्नांच्या प्रवासाचा पाठपुरावा केलेला आहे. विहिर हा चित्रपट ज्यांना अर्पण केलेला आहे त्या जी. ए. कुलकर्णींनी आणि आरती प्रभुंनीसुद्धा आपापल्या मार्गाने अनेक कथांमधून/कवितांमधून ह्या प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न केला. पण दृक-श्राव्य माध्यमातून ह्या विषयाला थेट हात घालण्याचे प्रयत्न विरळेच झालेले आहेत. उमेश विनायक कुलकर्णी ह्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाने ह्या विषयाला पूर्णपणे प्रामाणिक राहून विहिर ह्या चित्रपटाची निर्मिती केलेली ही फार कौतुकास्पद (आणि खरे तर अवघड) गोष्ट आहे.
नचिकेत आणि समीर ही दोन मावस भावंडे पत्रांमधून एकमेकांशी बोलताना चित्रपट सुरु होतो. ह्या नचिकेत आणि समीरचे नाते फारच सुंदरपणे निर्माण झाले आहे. अनेकांच्या बालपणात एक असा मोठा दादा असतो ज्याच्याकडे आपण तो जणु सर्वकाही असल्यासारखे पाहत असतो. समीरचा हा नचिकेतदादा अगदी पुर्णपणे उतरला आहे. पहिल्या थोड्या प्रसंगातून संपूर्ण पार्श्वभूमी (समीरचे कनिष्ट-मध्यमवर्गीय घर, नचिकेतची ब्राह्मणी गरिबी, एक मावशी अजून लग्न रहिलेली असणे वगैरे वगैरे) ठळकपणे उभी राहते. सगळ्यात धाकट्या मावशीच्या लग्नाला सुट्टीत सगळी भावंडे एकत्र येतात. समीर साधारण आठवी-नववीतला तर नचिकेत नुकतीच बोर्डाची परिक्षा दिलेला. आजोबांनी शेतात नुकतीच बांधलेली विहिर, तिथे पोहायला गेले असताना नचिकेतला जगण्याबद्दल, जगाबद्दल, नातेवाईक, त्यांचे परस्पर संबंध, त्यामागची कारणे अश्या आणि इतर अनेक विविध गोष्टींच्या पुढे प्रश्नचिन्हे दिसत असतात ते पुढे येते. त्याचवेळी समीरला मात्र अपेक्षित असणारा, सुट्टीत आपल्याशी खेळणारा नचिकेतदादा काय बोलतोय, असा का वागतोय ते कळेनासे होते. नचिकेत आणि समीर मधले संवाद ह्यातून इथे नचिकेतचा शोध, त्याला पडणारे प्रश्न, त्याचे समीरवर उमटणारे पडसाद आणि ह्या सगळ्याची इतर कुटुंबीयांबरोबर सांगड असे विविध पदर घेत चित्रपट मध्यांतरापर्यंत पोचतो. मध्यंतरात ह्या न समजण्याच्या ताणाने समीर आणि नचिकेतात छोटेसे भांडण होते. माझा एक मित्र म्हणतो त्याप्रमाणे उमेशच्या सिनेमात तो आपल्याला एका मुख्य रस्त्यावरुन पुढे नेतो. पण तसे जाताना अधे-मधे ज्या गल्ल्या, रस्ते लागतात त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता, त्या आड रस्त्यांवर थोडेसे पुढे डोकावून, चाहूल घेउन मग पुढे नेतो.
मध्यंतरानंतर हा चित्रपट नचिकेताचे प्रश्नांच्या मागाने समीरचा प्रवासाच्या मार्गाने जातो. इथून पुढचे मात्र मला शब्दात मांडणे कठिण. ते बघण्यातच खरा अनुभव आहे. तसेच काही लिहिल्यास हा चित्रपट बघण्यार्यांना उगाचच सगळी कथा आधीच सांगितल्यासारखे होईल.
चित्रपटातल्या सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट काम केलेले आहे. पण समीरचे काम मदन देवधर ह्या गुणी कलाकाराने अचाटच केले आहे. उमेशच्या गिरणी ह्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लघुचित्रपटातला गिरणीशेट म्हणजेच हा मदन. नुकत्याच आलेल्या एक कप च्या ह्या सुमित्रा भावे-सुनिल सुखथनकर ह्यांच्या चित्रपटातसुद्धा त्याचे चांगले काम केले आहे. नच्यादादाबद्दल असलेले ते आकर्षण, त्या वयात तोच एक आदर्श असणे, नच्यादादा मात्र सापडत नाहिये – तो जे वागतोय ते झेपत नाहिये हे थोडंफार कळणं आणि दुसर्या अंकात जो प्रवासाचा वेग समीरने पकडलाय ते अप्रतिम आहे.
समीरची विहिरीतली पहिली उडी ही केवळ अचाट. जो कोणी विहिरीत पोहायला शिकलाय त्याला माहिती आहे की उडी ही पाण्यावर आदळताना येणार्या अनुभवाचे एक साधन आहे. ते खाली येणे, त्यासाठी मनाचा हिय्या करणे हे सगळे पाण्यावर आदळायचा जो अनुभव आहे त्यासाठी आहे. मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे ते विहिरीवर आदळने. तो इसेन्स जसाच्या तसा त्या दृश्यात उतरला आहे. असेच अजून एक प्रभावी दृश्य म्हणजे नाक दाबून जेव्हा समीर जलतरण तलावात बुडण्याच्या अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो ते. पाण्यातून दिसणारे ते त्याचे हालणारे (रिफ्रॅक्टेड) शरीर, त्याच्या हातांची होणारी आणि पाण्याबाहेरून अजून जास्त वेडीवाकडी भासणारी हालचाल सगळे काही सांगून जाते.
सुधिर पलसाणेने – सिनेमॅटोग्राफरने - कमालच केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील हा भाग अगदी जिवंत उभा केला आहे त्याने. आणि कुठेही उगाचच केलेल्या चमत्कृती नाहियेत. एक दीर्घकथा उलगडत वाचावी त्याप्रमाणे त्याने हा चित्रपट आपल्यासमोर उघडलाय. संपूर्ण चित्रपटभर कॅमेरा प्रवासाला निघाल्यासारखा फिरतो. शेवटी शेवटी तर जो वेग येतो तो अगदी मस्त पकडलाय.
चित्रपटाच्या कलाटणीच्या प्रसंगात कुठेही अति-नाट्यमयता न आणल्यामुळे ती घटना केवळ एक घटना होते. चित्रपटाचा संदर्भबिंदू (सेंटर) होत नाही. त्यामुळेच जवळच्या व्यक्तिचा मृत्यु, त्याचा बसलेला धक्का, त्यामुळे कोलमडलेले भावविश्व आणि त्यातून सुरु झालेला प्रवास एव्हड्याच पुरता हा चित्रपट मर्यादित राहत नाही, मानसशास्त्रावरची डॉक्युमेन्ट्री होत नाही. तसा तो होवू शकला असता. समीर, सिनेमाचा नायक – मध्यवर्ती विचार (फोकस)– व्हायचा धोका होता. पण चित्रपटाची मध्यवर्ती भुमिका (फोकस) ही ते प्रश्न, त्यातून निर्माण झालेला प्रवास हीच राहिली आहे. आणि माझ्या मते हा खरा मास्टरस्ट्रोक आहे.
बाकी सगळ्या कलाकारांनी अतिशय नैसर्गिकपणे, साधा अभिनय केलाय. ज्योती सुभाष, डॉ. आगाशे, गिरिश कुलकर्णी आणि इतर छोट्या कलाकारांनी आपापल्या भुमिका चपखल निभावल्या आहेत. नचिकेतच्या आईने दारुड्या नवरा असलेली, घर चालवणारी पण मनातून पार पिचलेली बाई सुरेखच उभी केली आहे. लपंडाव, पत्ते, कानगोष्टी ह्या खेळातून सगळेच मस्त उभे राहिलेत. अश्विनी गिरी तर मस्तच. मी ह्या अभिनेत्रीच्या प्रेमातच पडलेलो आहे. वळुमध्ये हिची छोटीशी भुमिका होती. पण ’एक कप च्या’ आणि आता ’विहिर’ ह्या दोन चित्रपटात मात्र तिने अफलातून काम केलेले आहे. एका प्रसंगात ती साडी नीट करता करता फोनवर बोलत असते तो म्हणजे नैसर्गिक अभिनयाचा सुंदर नमुना आहे.
काफ्काचा के, दस्तोयव्हस्कीचा रास्कालनिकॉव्ह, कुठल्यातरी एका प्रखर क्षणी बंदिस्त झालेला बळवंतमास्तर, निराशेच्या टोकाला पोचलेला चांगदेव – कित्येक उदाहरणे आहेत जिथे मृत्यु आणि जगण्याच्या उद्दिष्टांच्या वा त्यांच्या गाभ्याच्या शोधात होणारा प्रवास हा रुढार्थाने अपयश-निराशा आणि दुर्दैवाच्या मार्गावर जाउन पोचतो. अगदी असे वाटावे की असा प्रवास हा निराशेतच संपणे हे स्वाभाविकच आहे. दुसर्या टोकाला ज्ञानेश्वर, विवेकानंदांपासून घरबार सोडून जाणार्या संन्याश्यांपर्यंत सर्वजण एका अतिशय व्यक्तिसापेक्ष (आणि म्हणुन शास्त्रीय व तार्कीक कसोट्यांवर पडताळून न पाहता येण्याजोग्या) पण कदाचित काल्पनिक (सेल्फ-डिसिव्ह्ड) सुखाच्या मागे लागून सर्वच सोडून देतात. हा चित्रपट मात्र पॉझिटिव्ह नोटवर येतो. माझ्या मते सती भावे आणि गिरिश कुलकर्णींच्या पटकथेचे हे सगळ्यात मोठे यश आहे.
चित्रपटाची लांबी काही जणांना अधिक वाटेल तर काहींना तो संथ वाटेल. मला काही प्रसंगात त्या प्रसंगांतील भावनांची घनता/गंभिरता काही कलाकरांना पेलत नाहिये की काय असे वाटले. पण ही सर्व चर्चा चित्रपट बघितल्यावर सगळेजण करतीलच. माझ्या परीने मी मूळ विषयाबद्दल वा प्रसंगांबद्दल कमीत-कमी लिहायचा प्रयत्न करीत मला काय वाटले ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे परिक्षण नक्कीच नाहिये आणि हा विषय मला जवळचा असल्याने मी पार्श्यालिटी अंपायर झालो असण्याची शक्यता आहे.
तर चू.भू.दे.घे.
Monday, August 24, 2009
खरडः
दंडोबा: http://www.maayboli.com/hitguj/messages/75/132710.html?1191579429
दिवाळी: http://www.maayboli.com/hitguj/messages/75/135453.html?1197264087
म्हाद्याचं कलाट: http://vishesh.maayboli.com/diwali-2008/22
तीन पत्त्यांचा तमाशा: http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2007/node/570.html
वारी -भाग १: http://www.maayboli.com/node/1339
वारी -भाग २: http://www.maayboli.com/node/1349
वारी - भाग ३: http://www.maayboli.com/node/2356
वारी - भाग ४ :http://www.maayboli.com/node/2363
वारी - भाग ५: http://www.maayboli.com/node/2836
वारी - भाग ६: http://www.maayboli.com/node/9557
Saturday, August 08, 2009
English Books
The Trouble with physics - Lee SmolinType - Non-fiction Science
Six Great Modern Short Novels - Type - Fiction Novellas
Siddhartha - Hermann HesseType - Fiction Novel
The Indian Economy - Bimal JalanType - Non-fiction Economics
The New Left: The Anit-Industrial Revolution - Ayn RandType - Non-fiction Philosophy
High: Stories of survival from Everest and K2 - Clint WillisType - Non-fiction Adventure
The Mammeries of the Welfare State - Upamanyu ChatterjeeType - Fiction Novel
The Wisdom of Sartre - Jean-Paul SartreType - Non-fiction Philosophy
Plain Tales from the Hills - Rudyard KiplingType - Fiction Short Stories
Seven Summits - Dick BassType - Non-fiction Adventure
Bhagwan - The God That Failed - Hugh MilneType - Non-fiction Autobiography
The Happy Isles of Oceania - Paul TherouxType - Non-fiction Travelogue
Innovation and Entrepreneurship - Peter DruckerType - Non-fiction Management
The Fall - Albert CamusType - Fiction Novel
Himalayan Blunders - John DalviType - Non-fiction History
Portrait of the Artist as a Young Man - James JoyceType - Fiction Novel
Raise High the Roof Beam, Carpenters/Seymour - J SalingerType - Fiction Novellas
Inside Out: A Personal History of Pink Floyd - Nick MasonType - Non-fiction Autobiography
What is literature? - Jean-Paul SartreType - Non-fiction Philosophy
Millory The Magician - Paul TherouxType - Fiction Novel
The Catcher In the Rye - J SalingerType - Fiction Novel
Riot After Riot - M AkbarType - Non-fiction Current Affairs
Chronicle of a Death Foretold - Gabriel MarquezType - Fiction Novel
Games People Play - Eric BerneType - Non-fiction Psychology
To the Ends of the Earth - Paul TherouxType - Non-fiction Travelogue
The Complete Novels of Franz Kafka - Franz KafkaType - Fiction Novel
The Great Masters - Profiles in Hinsustani Classical Vocal Music - Mohan NadkarniType - Non-fiction Biographies
Indian Controversies - Arun ShourieType - Non-fiction Current Affairs
The Pattern of Communist Revolution - a history of world communism - Hugh Seton-WatsonType - Non-fiction History
The God That Failed - Richard CrossmanType - Non-fiction Autobiography
David Copperfield - Charles DickensType - Fiction Novel
The History of Mr. Polly - H WellsType - Fiction Novel
We Bought an Island - Evelyn AtkinsType - Non-fiction Autobiography
Sons and Lovers - D LawrenceType - Fiction Novel
The Third World War August 1985 - John HackettType - Non-fiction History
Collected Short Stories - 3 - W MaughamType - Fiction Short Stories
Doctor Zhivago - Boris PasternakType - Fiction Novel
The Stranger - Albert CamusType - Fiction Novel
Being and Nothingness - Jean-Paul SartreType - Non-fiction Philosophy
A Brief Hostory of Time - Stephen HawkingType - Non-fiction Science
Zorba The Greek - Nikos KazantzakisType - Fiction Novel
Brothers Karmazov - Fyodor DostoevskyType - Fiction Novel
The Virtue of Selfishness - Ayn RandType - Non-fiction Philosophy
The Idiot - Fyodor DostoevskyType - Fiction Novel
Political Diary - Deendayan UpadhyayaType - Non-fiction Current Affairs
Roses in December - M ChaglaType - Non-fiction Autobiography
Crime and Punishment - Fyodor DostoevskyType - Fiction Novel
Of Human Bondage - W MaughamType - Fiction Novel
Doctor from Lhasa - T RampaType - Non-fiction Autobiography
The Age of Reason - Jean-Paul SartreType - Fiction Novel
The State of Africa - Martin MeredithType - Non-fiction Current Affairs
Shantaram - David RobertsType - Fiction Novel
From Beirut To Jerusalem - Thomas FriedmanType - Non-fiction Current Affairs
The Secret History - Donna TarttType - Fiction Novel
The Fiancee and Other Stories - Anton ChekhovType - Fiction Short Stories
The Call Of The Wild - Jack LondonType - Fiction Novel
The story of a Non-marrying man and other stories - Doris LessingType - Fiction Short Stories
Six easy pieces - Richard FeynmanType - Non-fiction Science
One Hundred years of Solitude - Gabriel MarquezType - Fiction Novel
The Kite Runneer - Khaled HosseiniType - Fiction Novel
Falling Over Backwards - An Essay against Reservations and against Judicial Populism - Arun ShourieType - Non-fiction Current Affairs
Into the Wild - John KraukerType - Non-fiction Biographies
Clash of civilizations and remaking of world order - Samuel HuntingtonType - Non-fiction Current Affairs
Who Are We? The Challenges to America's National Identity - Samuel Huntington Type - Non-fiction Current Affairs
Bhuvanshom - Bonophul Type - Fiction Novel
The Mosquito Coast - Paul TherouxType - Fiction Novel
One flew over the cuckoo's nest - Ken Kesey
Atlas Shrugged - Ayn Rand
मराठी पुस्तके
गणुराया आणि चानी - चिं त्र्य खानोलकर
रात्र काळी, घागर काळी - चिं त्र्य खानोलकर
नक्षत्रांचे देणे - आरती प्रभू (चिं त्र्य खानोलकर)
दिवेलागण - आरती प्रभू (चिं त्र्य खानोलकर)
ऑक्टोपस - श्री ना पेंडसे रथचक्र - श्री ना पेंडसे
लव्हाळी - श्री ना पेंडसे
माणूस आणि लेखक - श्री ना पेंडसे
हिरवे रावे - जी ए कुलकर्णी
पिंगळावेळ - जी ए कुलकर्णी
रमलखुणा - जी ए कुलकर्णी
पैलपाखरे - जी ए कुलकर्णी (अनुवादीत दीर्घकथा)
रमलखुणा - जी ए कुलकर्णी
सांजशकुन - जी ए कुलकर्णी
गोफ - गौरी देशपांडे
शुभ्र काही जीवघेणे - अंबरीश मिश्र
बहिणाबाईंची गाणी - बहिणाबाई चौधरी
वेटिंग फॉर गोदो - सॅम्युएल बेकेट (अनु.: माधुरी पुरंदरे)
ब्रेड विनर - डेबोरा एलिस्
लॉर्ड ऑफ द फ्लाइज - विल्यम गोल्डींग (अनु.:जी ए कुलकर्णी)
वर्तमान - अश्विनी धोंगडे
पंजाबी लघुकथा - इंडियन बूक ट्रस्ट
बंगाली लघुकथा - इंडियन बूक ट्रस्ट
मल्याळम लघुकथा - इंडियन बूक ट्रस्ट
मृत्युनंतर - शिवराम कारंथ (अनु.: केशव महागावकर)
शिकार - यशवंत चित्ताल (अनु.: केशव महागावकर)
एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
इस्रायल - छळाकडून बळाकडे - नारायण पालकर
मातृका - पु शि रेगे
सावित्री - पु शि रेगे
द रुट्स - अॅलेक्स हॅले (अनु.: सिंधु अभ्यंकर)
तोत्तोचान - तेत्सुओ कुरोयानागी (अनु.: चेतना सरदेशमुख-गोसावी)
किमया - माधव आचवल
जास्वंद - माधव आचवल
कर्मयोग - स्वामी विवेकानंद
मिरजेतील हिंदू पुजास्थाने - श्रीधर हरी दातार
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी - प्रतिभा रानडे
टीका स्वयंवर - भालचंद्र नेमाडे
कोसला - भालचंद्र नेमाडे
बिढार - भालचंद्र नेमाडे
झूल - भालचंद्र नेमाडे
जरीला - भालचंद्र नेमाडे
हूल - भालचंद्र नेमाडे
सूर्य - श्री दा पानवलकर
औदुंबर - श्री दा पानवलकर
आंधळ्यांच्या गायी - मेघना पेठे
सारे प्रवासी घडीचे - जयवंत दळवी
मुस्लीम मनाचा शोध - शेषराव मोरे
पर्व - एस एल भैरप्पा (अनु.: उमा कुलकर्णी)
कळ्यांचे नि:श्वास - विभावरी शिरुरकर)
व्यासपर्व - दुर्गा भागवत
टारफुला - शंकर पाटील
अधर्मयुद्ध - गिरीष कुबेर
हा तेल नावाचा इतिहास आहे - गिरिष कुबेर
इट्स ऑल्वेज पॉसिबल - किरण बेदी (अनु.: लीना सोहोनी)
ईंटरप्रिटर ऑफ मेलडीज - झुंपा लाहिरी (अनु.: भारती पांडे)
कोरडी भिक्षा - श्रिनिवास कुलकर्णी
सोन्याचा पिंपळ - श्रिनिवास कुलकर्णी
स्टुडिओ - सुभाष अवचट
वाइज अँड आदरवाइज - सुधा मुर्ती
संध्याकाळच्या कविता - ग्रेस
बेहतरीन नझ्मे और गझले
जातक - विंदा करंदीकर
चांदणवेल - बा भ बोरकर
मर्ढेकरांची कविता - बा सी मर्ढेकर
प्रातिनिधीक कवितांये - अमृता प्रीतम
शाळा - मिलिंद बोकील
व्यंकटेश माडगुळकर यांची कथा
गाडगीळांच्या कथा
अरविंद गोखले यांची कथा
१०० कविता - संपादक कुसुमाग्रज
राग दरबारी - श्रीलाल शुक्ल (अनु.: श्रीपाद जोशी)
त्रिसुपर्ण - प्रभाकर पाध्ये
Tuesday, August 21, 2007
desert.. snow.. mountains.. alone
first bolt left me wretched.. because i assumed a lot.. i depended a lot on someone else.. i took decisions (even emotional ones) without considering the dependance on the decisions of someone else's which were entirely not in my control nor i would had attempted to bring them under my control (even if that was possible) for the reason of caring about my principles.. then whether they were individualistic or agnostic, didnt matter.. so what did i learn? wise men learn from their mistakes not to repeat them.. but history repeats itself.. and there were atleast a few wise men present at every crucial juncture in the history.. so even though the world is full of non-wise, by the principle of learning and knowing, wise should have taken necessary steps to avoid the same mistakes committed earlier.. but that's not the case.. and i repeated the history..
somethings do not happen.. howsoever you try to make them happen.. it's just the function of your action and everyone else's action.. just like f(your action+actions of everyone else).. in everyone else comes living and non-living entities.. right from the actions of your girlfriend to the movement of cellestial objects in some distant galaxy.. and that's where you bacome helpless.. literally helpless.. there is nobody out there other than you.. you are alone in this world.. the world is with respect to your frame of reference.. you die, world dies..
and so i thought that it wasn't really in my hand.. she was not for me... rather in her view, i was not for her.. so to keep my mind away from this topic, i start thinking what is my world, my frame of referance and what are my actions and actions of others that determine the next moment.. so, you see, my thoughts get into a recursive loop, where at the end of each loop i enter into even deeper shit.. so a point comes when all around i see is shit..
thus i completed the second loop today.. am i ready for the third innings? am i going to commit the same actions even though i know i have been a failure throughout? do i have the courage to do so or will i be just plain dumb to do so again? is the function above gives a slightest hint of anything good to happen? or i should accept that whatever is happening and is going to happen is good? or there's just no good or bad or ugly.. it's just that the my life is simply pathetic, going nowhere..
and and.. there remains only one way out.. thats where i start dreaming aobout... desert, snow and mountain.. i am all alone.. alone in those vast landscapes of varying beauty.. way far from the shit.. wishing never to return..